Ad will apear here
Next
धर्म म्हणजे काय?


मध्य प्रदेशमधला जीव भाजून टाकणारा रखरखीत उन्हाळा. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी भोपाळला एका परिषदेसाठी गेले होते. त्यातूनच वेळ काढून मला जवळची काही जुनी मंदिरं बघायची होती. इतक्या कहर उन्हाळ्याची सवय नव्हती खरं तर, त्यात दोन-तीन दिवस सततचा प्रवास, जागरण ह्यामुळे अंगात जरा कणकणही होती; पण ही गुर्जर प्रतिहार राजांनी बांधलेली मंदिरं मला फारा वर्षांपासून खुणावत होती. गाडीही ठरवलेली होती. म्हणून क्रोसिनची एक गोळी खाऊन पहाटेच निघाले. 

आधी विदिशेचा हेलिओडोरस ह्या ग्रीक कृष्णभक्ताने उभा केलेला गरुडस्तंभ बघितला. तिथून जवळच असलेलं बीजमंडळचं भव्य मंदिर बघितलं. धर्मांध क्रूरकर्मा औरंगझेबाची वक्रदृष्टी पडून त्याने उद्ध्वस्त केलेलं हे विजयादेवीचं मंदिर. त्या मंदिराची शिखरं पाडून त्यावर घुमट चढवून त्याला आलमगीर मस्जिद असं नाव देण्याचा पराक्रमही औरंगझेबाने केलेला होता. सध्या ही वास्तू अशीच पडून आहे. इतस्ततः विखुरलेल्या भग्न मूर्ती, मंदिराचे खांब, कलशाचे तुकडे वगैरे बघून संताप येतो आणि आपण ह्या बाबतीत काहीही करू शकत नाही हे जाणवून मन कष्टी होतं. 

तशीच पुढे गेले. तिथून जवळजवळ ७० किलोमीटरवर अजून एका गावाजवळ जुन्या मंदिरांचा समूह होता, ही माहिती एएसआयच्या वेबसाइटवरून कळली होती. एव्हाना अकरा वाजले होते. वर सूर्य तळपत होता आणि कातडी भाजून काढणारा कोरडा उकाडा एसी गाडीतसुद्धा जाणवत होता. सकाळी साडेसहा वाजता गोळी खाऊन बाहेर पडले होते, त्या गोळीचाही प्रभाव आता उतरत होता. विलक्षण थकवा जाणवत होता. सारखी तहानही लागत होती. आजारी असताना बाहेर काही खायचं नाही म्हणून पाणी आणि काही फळं बरोबर घेऊन बाहेर पडले होते; पण खावंसं वाटत नव्हतं. फक्त पाच-दहा मिनिटांनी पाणी पीत पीत मागच्या सीटवर मलूल झोपून होते मी. 

सारथी चांगला होता. माझी एकूण अवस्था बघून त्याने विचारलंही, ‘भोपाळ वापस चलें?’ पण इतक्या प्रयासानंतर घडवून आणलेला हा प्रवास अर्ध्यावर सोडायला मी तयार नव्हते. शिवाय परत इतक्या अनवट ठिकाणी इतक्या दूर कोण येणार, हा विचार होताच. त्यामुळे मी ठरवलं, की काही झालं तरी ट्रिप पूर्ण करायची. हवं तर दुसऱ्या दिवशी भोपाळला आराम करू. 

दरमजल करत करत आम्ही त्या दुसऱ्या गावात पोहोचलो. ग्यारासपूर नावाच्या गावाजवळच पाच मैलांच्या परिसरात ही सर्व पुरातन मंदिरं होती. एके काळी ह्या भागात गुर्जर प्रतिहार राजांचं राज्य होतं, तेव्हा त्यांनी बांधवून घेतलेली ही मंदिरं. नागर शैलीत बांधलेली. अतिशय देखणी, पण पुढे मुसलमानी आक्रमकांचे घणाचे घाव, काळाचे तडाखे आणि आता सर्वसामान्य हिंदू जनतेची इतिहासाबद्दलची अनास्था ह्यामुळे आता अगदीच दुरवस्थेत असलेली ही मंदिरं. मध्य प्रदेशच्या तसल्या त्या उन्हात, अंगात तापामुळे त्राण नसतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी ती सर्व मंदिरं बघितली. कदाचित माझ्या त्या वेळच्या विकल मनःस्थितीचाही परिणाम असेल; पण प्रत्येक मंदिर बघताना मी अक्षरशः रडले. एके काळी वैभव शिखरावर असलेली ही मंदिरं आजकाल भटक्या गाई-गुरांचं रवंथ करण्याचं ठिकाण म्हणून उरली आहेत, हे बघून खूप खिन्न वाटत होतं मला. 

आता फक्त एक शेवटचं मंदिर राहिलं होतं. ते रस्त्यापासून चांगलं दोनेक किलोमीटर दूर होतं. त्यामुळे गाडी जाण्याचा प्रश्नच नव्हता. आता मी अगदीच थकले होते. बरोबर घेतलेल्या बाटलीत पाणीही अगदी थोडकं राहिलं होतं. ऊन तर रणरणत होतं. हे शेवटचं मंदिर बघायला जावं की नाही हा प्रश्न होता. परत स्वतःला समजावलं, की आता ह्यानंतर थेट भोपाळला हॉटेलमध्येच जायचंय, गाडीत आराम करू आणि पायात पेटके आलेले असतानाही तशीच नेटाने निघाले. 

मंदिरापर्यंतचा रस्ता म्हणजे शेताच्या बांधावरची खडबडीत पायवाट होती. वाटेत दगड, धोंडे, काटेरी झुडपं, काय नि काय. वस्तीही नव्हती. फक्त एकच घर दिसलं मला वाटेत. छोटंसं, मातीचं घर, शेजारी गोठा, बाहेर सारवलेलं अंगण, एक उभी ठेवलेली खाट, बाहेर एक मोठं कडुनिंबाचं झाड आणि त्याच्या गर्द सावलीत झोपलेलं एक वासरू आणि एक कुत्रा. दुपारच्या अभ्रकी उन्हातून पाय ओढत चाललेल्या मला त्या क्षणी त्या वासराचा विलक्षण हेवा वाटला. 

शेवटी एकदाची मंदिरापर्यंत पोहोचले. एके काळी मंदिर विलक्षण सुंदर दिसत असावं, आता मात्र कुठल्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत होतं. मी त्या संपूर्ण परिसरात एकटीच होते. मंदिराची ती परिस्थिती पाहून सकाळपासूनचा शारीरिक आणि मानसिक थकवा, अगतिक संताप, खिन्नता सर्व तिथे उफाळून वर आलं. त्या मंदिराच्या पायरीवर बसून गुडघ्यात मान घालून मी हमसून हमसून रडले. किती वेळ तशी बसून होते कोण जाणे; पण एका क्षणी जाणवलं की आपल्याला गाडीजवळ चालत परत जायचंय आणि हातापायात आता अगदीच त्राण उरलेलं नाही. रडून रडून विलक्षण तहान लागली होती. बरोबरच्या बाटलीतलं उरलेलं पाणी घटाघट पिऊन टाकलं आणि तशीच अंगातली सर्व शक्ती एकवटून पाय ओढत गाडीकडे परत निघाले. 

वाटेत ते मघाशी पाहिलेलं घर परत लागलं. आता मात्र मला त्या निंबाच्या सावलीचा मोह आवरेना. थोडा वेळ निंबाच्या सावलीत बसून विसावा घ्यावा, म्हणून मी वाट सोडून त्या घराजवळ गेले. माझी चाहूल लागताच वासरू धडपडून उभं राहिलं आणि कुत्रं अंग झटकून जोरजोरात भुंकायला लागलं. दुपारचे दोन-अडीच वाजले असतील तेव्हा. कुत्र्याला गप्प करायचा मी प्रयत्न करत होते, इतक्यात घराचं दार उघडून एक बाई बाहेर आली. तिच्या हातात काठी आणि चेहऱ्यावर संशयाचे भाव होते. तिचंही बरोबरच होतं. घर मुख्य वस्तीपासून इतकं दूर, कुत्रा भुंकला तर चोरा-चिलटांचा संशय आधी येणार. 

मी तिला म्हटलं, ‘दीदी मंदिर देखने आयी थी. बहुत गर्मी है. थोडी देर छांव में बैठ सकती हूँ?’ तिने आधी आजूबाजूला बघून मी एकटीच आहे याची खात्री करून घेतली आणि मगच ती पांढरेशुभ्र दात दाखवत स्वच्छ हसली. ‘हां हां, बैठो ना’, ती म्हणाली. मी निंबाला टेकून खाली बसले आणि डोळे मिटून घेतले. रखरखत्या उन्हातून एकदम गार सावलीत आल्यामुळे डोळ्यापुढे एकदम अंधेरी आल्यासारखं वाटत होतं. माझा थकलेला, ओढलेला चेहरा बघून ती एकदम माझ्याजवळ आली, म्हणाली, ‘तबियत खराब है क्या दीदी’? आणि आत जाऊन एक कथलाची मोठी परात आणि घागरभर पाणी घेऊन आली. परातीत पाणी ओतून मला म्हणाली, ‘जूते उतारो दीदी और पानी में पांव रखो।’ मी तसं केलं. त्या थंडगार पाण्यात पाय बुडवल्यावर मला एकदम थकवा कमी झाल्यासारखं वाटलं. ती पुन्हा आत जाऊन एका स्टीलच्या ग्लासात पाणी आणि अॅल्युमिनियमच्या ताटलीत एक मोठा गुळाचा खडा घेऊन आली. ‘ये खाओ’ तिने विनंतीवजा आज्ञाच केली मला जवळजवळ. 

मी ते पाणी प्यायले आणि गुळाचा खडा सावकाश चाखत-माखत खाल्ला. आता मला पुष्कळच बरं वाटत होतं. पहिल्यांदाच मला जाणवलं, की आपण सकाळपासून एक सफरचंद सोडल्यास काही खाल्लेलं नाही आणि सपाटून भूक लागलेली आहे. माझ्या मनातले विचार वाचल्यागत तिने पुढचा प्रश्न विचारला ‘खाना खाई हो? कुछ खाओगी?’ मी जरा ओशाळ्या चेहऱ्यानेच हो म्हटलं. ‘रुको जरा, मैं कुछ लाती हूँ’ म्हणून ती आत गेली आणि थोड्या वेळाने एका वाटीत गरम गरम डाळ आणि एक जाड रोटी घेऊन आली. रोटी खास माझ्यासाठी ताजी ताजी बनवली असावी. भुकेजलेल्या मला ते जेवण अमृतासारखं लागलं. 

सावकाश डाळीत रोटी बुडवून बुडवून मी ती चवीने खाल्ली. ‘और लाऊं?’ तिने विचारलं. मी नाही म्हटलं आणि थाळी कुठे घासून ठेवू असं विचारल्याबरोबर हसून म्हणाली, ‘आप तो घर आये हो, आपसे काम कारवायेंगे?’ 

एव्हाना मला पुष्कळच बरं वाटत होतं. नंतर माझ्या तिच्या खूप गप्पा झाल्या. तिला तीन मुलं होती. मोठा आठवीत आणि धाकटी चौथीत. तिघंही चालत गावातल्या शाळेत जात होती. नवरा आणि दीर शेतावर गेले होते आणि आजारी सासू घरात झोपली होती. मी एकटी का फिरते, एकटीने भटकताना मला भीती नाही वाटत का? माझ्या घरी कोण कोण आहेत, वगैरे नेहमीचे प्रश्न तिने मला विचारले. मग काळजीच्या स्वरात म्हणाली, ‘दीदी तबियत ठीक नहीं हैं तो घुमा ना करो, यहाँ की धूप बडी खराब है।’ 

इतक्यात रस्त्याच्या दिशेने गलका ऐकू आला, तिची मुलं शाळेतून परतत होती. तिघंही घरी आली आणि आश्चर्याने माझ्याकडे बघतच राहिली. धाकटी मोठी गोड होती, आपले मोठे मोठे भोकर डोळे सताड उघडून आईच्या पाठीमागे दडून माझ्याकडे बघत होती. सिया तिचं नाव. मी तिला जवळ बोलावून पाचशे रुपये काढून तिच्या हातात दिले, तर ती घेईना, आईकडे बघू लागली. 

‘उसे कहो ना दीदी, ले ले’, मी तिच्या आईला म्हटलं, तर ती हसून मला म्हणाली, ‘दीदी हम तो गिरस्थ हैं, गिरस्थ का धर्म है देना, लेना नहीं।’ एका वाक्यात केवढं मोठं धर्म तत्त्वज्ञान सांगून गेली होती ती. हिंदू धर्मात अर्थार्जनाचा अधिकार गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या व्यक्तीला असतो आणि त्या स्वकष्टाने कमावलेल्या धनातून त्या व्यक्तीने इतर आश्रमांचा भार उचलणं अपेक्षित असतं, हे मी धर्मशास्त्रात वाचलं होतं; पण ही बाई तो धर्म जगत होती. 

मघाशी त्या मंदिराची दुरवस्था पाहून रडताना मला विलक्षण उदास, भकास वाटत होतं; पण आता त्या बाईच्या बोलण्यातून माझ्या मनाची मरगळ निघून गेली. मुसलमानी आक्रमकांनी हिंदू मंदिरं भलेही नष्ट केली असली, तरी भारताच्या नसानसात भिनलेला धर्मविचार ते नाही नष्ट करू शकले हे मला जाणवत होतं. मी प्रेमाने मुलांना खाऊसाठी देतेय म्हणून मी शेवटी ते पैसे त्या छोटीला घ्यायला लावलेच; पण त्या घरातून निघताना त्या बाईने आतून एक छोटी पिशवी माझ्या हातात दिली, त्यात चवळीसारखे काही दाणे होते, ‘ये हमारे खेत से है’ ती अभिमानाने म्हणाली. 

मी तिथून चालत गाडीकडे निघाले, तेव्हा मला खरोखरच खूप खूप बरं वाटत होतं. 

- शेफाली वैद्य

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WUVXCU
Similar Posts
कर्नाटकातलं अप्रतिम लक्ष्मी-नरसिंह मंदिर कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यात होसाहोलालू येथे वसलेलं लक्ष्मी-नरसिंह मंदिर म्हणजे होयसळ शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिराची माहिती देत आहेत शेफाली वैद्य...
Faith always moves me Particularly the simple, unshakeable faith that so many people in India have in their Gods. In my solo travels in India, I have met some remarkable people who have pursued dharma with a conviction that acts like a lodestar for them as they navigate their life’s journey across the sea of samsara. As you
Temples of Tamilnadu I am back from a four day visit to Tamil Nadu. My senses are still reeling under what I saw. I attended the wedding of friend Lalitha Anand’s daughter, the rituals and the festivities were so understated, so profound and so true to the Dharmik roots. It was wonderful to attend this function with friends
गोष्ट दोन वेणुगोपाळांची मला कर्नाटकमधल्या होयसळ राजांनी बांधवून घेतलेली मंदिरे फार आवडतात. क्लोरायटिक शिस्ट नावाच्या दगडाच्या शिळांवरून होयसळ राज्यातल्या कुशल शिल्पींची बोटे फिरली आणि त्या दगडाची रेष न् रेष जिवंत झाली. नजर ठरणार नाही इतकी सुंदर शिल्पे, मूर्ती. एका मंदिराचे शिल्पसौंदर्य बघून आपण भारावून जातो न जातो तोच दुसऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language